Headlines

दांडी आवारवाडीतील वीज समस्येवर तात्काळ उपाययोजना

नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांची कार्यतत्परता

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरातील दांडी आवारवाडी परिसरात विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने सातत्याने कमी – जास्त दाबाचा वीजपुरवठा होत राहिल्याने स्थानिक नागरिक त्रस्त बनले होते. या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांनी पुढाकार घेत विद्युत वाहिन्यांवरील वाढलेली झाडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून परिसरातील वीजवाहिन्यांवरील झाडी तोडून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली.

दांडी आवारवाडी परिसरात विद्युत वाहिन्यांच्या आजूबाजूला झाडांच्या फांद्या आणि झाडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या झाडीचा विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण होत असल्याने परिसरातील वीजपुरवठ्यात वारंवार कमी-जास्त दाबाची समस्या जाणवत होती. यामुळे दैनंदिन कामात नागरिकांना अडथळे येत होते. तसेच विद्युत वाहिन्यांजवळ वाढलेल्या झाडीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचीही भीती होती. या समस्येची माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी आवश्यक कार्यवाहीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार दांडी आवारवाडी येथील विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी हटविण्यात आली. त्यामुळे वीजवाहिन्यांभोवतीचा अडथळा दूर करून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.

दांडी आवारवाडीतील वीजपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष देत नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी तात्काळ कार्यवाही केल्यामुळे विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून नगरसेविका सौ. आचरेकर यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page