*⚡कणकवली ता.१८-:* मुंबई गोवा महामार्गावरील जानवलीहुन कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीची दोन वाहनांना धडक बसून महामार्गावर जानवली मारुती मंदिरसमोर मोठा अपघात घडला. पुण्याहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारची समोरील जात असलेल्या अमेझ कारला धडक बसली. क्रेटा वेगाने अमेझ कारला धडकल्याने या अमेझ कारच्या पुढे असलेल्या रिक्षेला देखील मोठी धडक बसली.
धडक एवढी भीषण होती की क्रेटाचा समोरील बहुतांशी भाग दबला गेला होता. क्रेटाने धडक दिलेला अमेझ कारमधील एक महिला धडकेने गाडीच्या बाहेर फेकली गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली भाग हा अपघाताचा पॉईंट ठरला असून गेल्या काही दिवसात अनेक अपघात घडले आहेत.त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक बनले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जानवली पोलीस पाटील मोहन सावंत, मकरंद सावंत, परेश परूळेकर, कीर्तिकुमार राणे, दामू सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात रिक्षा व दोन्ही कारमधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातात रिक्षा व दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
