युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांचे प्रतिपादन
*⚡कणकवली ता.१७-:* तेली समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र यायला हवे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी. राज्यातील मंडळाच्या उपक्रमांची माहिती सर्वांना झाल्यास तेली ज्ञातीतील आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वांनी महाराष्ट्र प्रांतिक महासभेला संलग्न होऊन समाज जोडो अभियान यशस्वी करूया असे आवाहन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने समाज जोडो अभियानांतर्गत संताजी जगनाडे महाराज यांच्या पादुका व ग्रंथ रथयात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात आली आहे. नुकत्याच या रथयात्रेचे कणकवलीत आगमन झाले असता येथील पटवर्धन चौकात ढोलताशांच्या गजरात या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले .यावेळी सुवासिनींनी पंचारती ओवाळून पादुका व ग्रंथांची पूजा केली तर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव चंद्रकांत तेली यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महासभेच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी ओबीसी जनगणना व सामाजिक आरक्षण याबाबत आग्रही भूमिका मांडली. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने अवघ्या दोन दिवसात रथयात्रेचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुकही केले. यावेळी अशोक व्यवहारे यांच्या हस्ते लक्ष्मण तेली, एकनाथ तेली यांचा सत्कार करण्यात आला. गजानन शेलार यांनी दिलेला संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा समाज मंडळाकडे देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रांतिक अध्यक्ष एकनाथ तेली यांनी समाज जोडो अभियानाचे महत्त्व सांगून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. लक्ष्मण तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ यांनी केलेल्या उपक्रमाची माहिती दिली तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिकच्या उपक्रमांची प्रशंसा करून समाज जोडो अभियानात सहभागी असल्याचे सांगितले. यात्रेत प्रंतिकचे ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, मुंबई कार्याध्यक्ष चंद्रकांत भागवत, कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक जळगाव युवा कार्याध्यक्ष मयूर चौधरी कोकण विभाग युवा कार्याध्यक्ष नितीन खानविलकर मंडळाचे आबा तेली, निलेश कामतेकर, तुकाराम तेली, साईनाथ आंबेरकर, प्रकाश काळसेकर, तात्या कुवळेकर, शैलेंद्र डिचोलकर मैथिली तेली, व इतर समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रकांत तेली यांनी केले. तर आभार परशुराम झगडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तात्या कुवळेकर शैलेंद्र डिचोलकर संजय मालंडकर, दिलीप मालंडकर यांनी परीश्रम घेतले.
