पंचायत समितीच्या सभेत झाले उघड;विरोधकांसह भाजपच्या आठ सदस्यांची दांडी
मालवण दि प्रतिनिधी-: मालवणचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांच्याविषयी असलेली पंचायत समितीमधील भाजप सदस्यांची नाराजी आणि त्या नाराजीला शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मालवण तालुक्याच्या विकास कामांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या पंचायत समितीच्या आजच्या मासिक सभेलाच आठ सदस्यांनी दांडी मारल्याने कोरम अभावी विलंबाने सुरू झालेली मासिक सभा चार सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सभेवर आठ सदस्यांनी अघोषित बहिष्कार टाकल्याने आजची पंचायत समितीची सभा ही मालवण तालुक्याच्या किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी आणि चर्चेची ठरली आहे. अलीकडच्या काही दिवसात मालवण पंचायत समितीमधील भाजप सदस्यांमधील अंतर्गत गटबाजी या ना त्या कारणामुळे उफाळून आली असून या गटबाजीचे छुपे पडसाद काही वेळा पंचायत समितीच्या मासिक सभेतही दिसून आले आहेत या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात आज सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सभापतींसह उपसभापती राजू परुळेकर, सागरिका लाड आणि मनीषा वराडकर हे चारच सदस्य उपस्थित असल्याने अर्धातास उर्वरित सदस्यांची प्रतीक्षा करण्यात आली. यावेळी सभापतींनी काही सदस्याना फोन करून सभेची आठवण करून दिली. मात्र यानंतरही कोणीही सदस्य सभेस उपस्थित न राहिल्याने गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी पंचायत समिती अधिनियमाचे पुस्तक आणून किमान चार सदस्यांच्या उपस्थितीत सभा सुरू करता येत असल्याने नियमानुसार सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यानंतर केवळ २० ते २५ मिनिटात सभेचे कामकाज चालवून सभा आटोपती घेण्यात आली दरम्यान, पंचायत समितीच्या मासिक सभेस अनुपस्थित असलेल्या गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजच्या सभेला आम्ही ८ सदस्य जाणीवपूर्वक अनुपस्थित असल्याची प्रतिक्रिया दिली असून सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी आम्हाला विश्वासात न घेता स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतात. आम्हाला आठही सदस्यांना विचारात घेत नाहीत. तर प्रशासन देखील स्वतःची मनमानी करीत असून या बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.हे सांगतानाच श्री घाडीगांवकर यांनी आम्हा ८ सदस्यांशिवाय ४ सदस्यांच्या उपस्थितीत ते सभा चालवत असतील तर आमचे काही म्हणणे नाही. मात्र यापुढे पंचायत समितीच्या प्रत्येक सभेला आम्ही ८ जण उपस्थित राहून आमच्या मर्जीप्रमाणे बहुमताच्या जोरावर ठराव घेऊ असा इशारा घाडीगांवकर यांनी दिला तर या सभेनंतर सभापती अजिंक्य पाताडे यांनी सभेतील कमी उपस्थिती बाबत माहिती देताना कोणीही सदस्य नाराज नसून दोन सदस्य मुंबईला असल्याने आज येऊ शकले नाहीत. तर काहींची अन्य कामे असल्याने ते आज उपस्थित नसल्याचे सांगितले.
