*⚡दोडामार्ग ता.१६सुमित दळवी-:* शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जीवन गौरव पुरस्कार कुडासे हायस्कूलच्या सेवा निवृत्ती शिक्षिका सौ.श्रध्दा सुनिल वाडकर यांना पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते देण्यात आला.
त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संजय वेत्तृरेकर ,संघटक समिर परब दोडामार्ग तालूका अध्यक्ष शरद देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ ,मुंबई संचालित संस्थेने सौ.श्रद्धा सुनील वाडकर यांना दि.२३ सप्टेंबर १९८२ रोजी संस्थेच्या श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, दोडामार्ग या प्रशाळेत ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी संधी दिली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षं होते. वयाच्या २० व्या वर्षांपासून ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य तब्बल ३८ वर्षे अविरतपणे व विशेष ठसा उमटवणारे ठरले. या ३८ वर्षात त्यांनी १९८२ ते १९९० अशी आठ वर्षे पिकुळे विद्यालयात सेवा बजावली. १९९० ते १९९२ या दोन वर्षात न्यू इंग्लिश स्कुल मडूरा तर १९९२ पासून दि.३१ डिसेंबर२०२० पर्यत तब्बल २८ वर्षे त्यांनी कुडासे सरस्वती विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य बजावले. या कालावधीत त्यांनी फक्त ज्ञानदानाचेच कार्य न बजावता आपल्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवताना १९८६ मध्ये पिकुळे विद्यालयाच्या मदतनिधीसाठी ‘चांदणे शिंपित जा’ हा तिकीटविक्रीवर व्यावसायिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण तर केलेच शिवाय त्यात ‘रेखा’ ही व्यक्तिरेखा साकारून आपल्यातील अभिनय कौशल्यही अधोरेखित करून विद्यार्त्यांमध्ये अभिनयाची आवड निर्माण केली. याच दरम्यान त्यांनी मातृ प्रबोधनाचे महिला मेळावे आयोजित केले, पिकुळे गावात त्यावेळी बालवाडींची सोय नसल्याने स्थानिकांना सोबत घेऊन त्यांनी वाडीवार बालवाड्यांची स्थापना केली. कुडासे विद्यालयात ‘ग्रंथालय समृद्धीसाठी’ माझी वाढदिवसाची भेट पुस्तक योजना उपक्रम राबविला. दरवर्षी विज्ञान मेळाव्यांतर्गत विविध विषयांवर छोट्या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन करून त्याचे सादरीकरण केले.
सन २०१३-१४ मध्ये त्यांच्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या नाटिकेला दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या विषयावर आधारित पथनाट्य बसवून समाजात जनजागृती केली.
त्यांच्या ‘हरितक्रांती’ या विज्ञान एकांकिला दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला तसेच जिल्ह्यात व कोल्हापूर विभागातही प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाल्याने कुडासे विद्यालयाचे नाव विशेष प्रकाशझोतात आले. तर याचवर्षी त्यांच्या ‘सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली’ या एकांकिकेची राज्यस्तरावर निवड झाली. तंबाखूचे दुष्परिणाम या नाटिकेचे सादरीकरण, तर रद्दीतून ग्रंथालय, ओझ्याविना दप्तर, काव्यप्रतिभा यासारखे उपक्रम त्यांनी राबविले. सौ.श्रद्धा सुनील वाडकर यांचा जन्म आजगाव येथे दि.३० डिसेंबर १९६२ रोजी झाला. त्यांचे शिक्षणही आजगाव, शिरोडा या भागात झाले. अतिशय हलाखीची परिस्थिती असतांनाही त्यांनी त्याकाळात बी ए डी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल २०१४-१५ पासून विविध सेवाभावी संस्थांनी घेण्यास सुरुवात केली. २०१४-१५ मध्ये त्यांना शिक्षक भारती सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१५ मध्ये ‘मुंबई संध्या’ यांचा सेवादीप पुरस्कार, २०१६ मध्ये पारस काव्यकला जनजागृती संस्थेचा पुरस्कार, आद्यपक संघ सिंधुदुर्गचा मराठी विषयासाठी पुरस्कार, याचवर्षी ‘फरा’प्रतिष्ठान केर, दोडामार्गचा पुरस्कार, तर २०१७ मध्ये बा.रा.कदम गुरुजी ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या संस्थेने विश्वासाने ज्ञानदानाची संधी दिली त्याच संस्थेने त्यांच्या सेवेची, संस्थेप्रति असलेली तळमळ या बाबींचा विचार करून धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचा गुरुवर्य वी.न.नाबर आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा गौरव करून त्यांच्या उपक्रमशील सेवेला एकप्रकारे मानवंदनाच दिली.
