माझ्या मुलीला शिष्यवृत्ती द्या, अन्यथा उपोषणाला बसणार

शिवडाव येथील दीपक जाधव यांचा शिक्षाधिकार्‍यांना इशारा

*⚡कणकवली ता.२८-:* माझी मुलगी भक्ती ही एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली असून अद्यापही ती शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. येत्या 8 दिवसांत एनएमएमएस शिष्यवृत्तीचा तिला लाभ न मिळाल्यास मी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असा इशारा कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील दीपक रामचंद्र जाधव यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी मुलगी भक्ती जाधव ही शिवडाव माध्यमिक विद्यालयात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 पर्यंत शिकत होती. ती सन 2017-18 मध्ये एनएमएमएस परीक्षेत प्रविष्ट होऊन गुणवत्ता यादीमध्ये आलेली होती. तिने सन 2018-19 या वर्षात शिष्यवृत्ती मिळण्यासाठी परिपूर्ण अर्ज देखील भरला होता. सदरचा अर्ज आवश्यक प्रपत्रामध्ये भरून शिवडाव हायस्कूलमार्फत अंतिम मंजुरीसाठी आपल्याकडे आला होता. मात्र, तिला अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. या संदर्भात मी आपल्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवठा देखील केला. परंतु अद्यापही माझ्या मुलीला शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसांत शिष्यवृत्ती न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर मी उपोषण करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page