केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिली सिंधुदुर्ग बँकेच्या योजनांची माहिती

*⚡कणकवली ता.२१-:* महाराष्ट्र राज्य को.ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकोत्तर दशपूर्ती सोहळ्यानिमित्त मुंबई येथे आयोजित खास कार्यक्रमास उपस्थित असलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग बँकेच्या वाटचालीविषयी माहिती देण्यात आली. नाबार्ड मार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांसह सिंधुदुर्ग बँकेकडून शेतकरी, बेरोजगार, मच्छिमार, आंबा, काजू बागायतदार व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आदींसाठी सिंधुदुर्ग बँकेकडून राबविण्यात येणार्‍या नाविण्यपूर्ण योजनांची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. महाराष्ट्र राज्य को.ऑपरेटिव्ह बँकेच्या 110 शतकोत्तर दशपूर्ती निमित्त गुरूवारी मुंबईतील बँकेच्या सहकार सभागृहात राज्य सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. सर विठ्ठलदास ठाकरसी, पहिले कार्यकारी संचालक कै. वैकुंठभाई मेहता, माजी अध्यक्ष कै. प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या तैलचित्रांचा अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व राज्याच्या सहकार, बँकींग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तैलचित्र अनावरण सोहळा संपन्न झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्र राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सिंधुदुर्ग बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. सिंधुदुर्ग बँकेकडून जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार, आंबा, काजू व्यावसायिक, मच्छिमार, बचतगटांमधील महिला, दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती सतीश सावंत यांनी दिली. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी बँकेकडून राबविण्यात येणार्‍या शैक्षणिक योजना अशा नाविण्यपूर्ण योजनांविषयीची माहिती देण्यात आली. नाबार्डच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग बँक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य बँकेच्या मुंबई फोर्ट येथील सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृतिभवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सहकार क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. .

You cannot copy content of this page