*⚡मालवण ता.१२-:* राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून याबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण एसटी स्टँड येथे एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत प्रश्न जाणून घेतले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात धनगर समाज महासंघ रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे व मालवण तालुका अध्यक्ष मंगेश झोरे यांनी दिला. महाराष्ट्र राज्यात एसटी कर्मचारी यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून अद्याप त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत व सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक दिसत नाही. या आंदोलनास ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली, सिंधुदुर्ग जिल्हा च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंबा देण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मालवण एसटी स्टँड येथे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. एसटी बस ही सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी आहे. गेले तीन दिवस ती बंद असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. यास सर्वस्वी जबाबदार राज्यसरकार आहे. भारतीय संविधानाच्या आधारित असणाऱ्या लोकशाहीच्या मार्गाने एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संप करीत आहे, या संपाला आमचे पूर्ण समर्थन आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश रस्त्यावर उतरेल, असा इशारा महासंघाचे सिंधुदूर्ग जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे व मालवण तालुका अध्यक्ष मंगेश झोरे यांनी यावेळी दिला. यावेळी तालुका सहसचिव ओंकार डोईफोडे, तालुका सदस्य संतोष झोरे, देवराज झोरे आदी उपस्थित होते.
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा पाठिंबा
