मच्छिमारांनी सोडले पुन्हा समुद्रात डॉल्फिन पाहण्यासाठी झाली हाती गर्दी
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील चिवला बीचवर पारंपारिक मच्छीमारांनी लावलेल्या रापणीच्या जाळ्यात डॉल्फिन मासे सापडून आले. १५ हुन अधिक डॉल्फिन मासे आढळून आल्याने मच्छीमारांनी तात्काळ त्यांची सुटका करत त्यांना समुद्रात सोडून दिले. हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती. मालवण चिवला बीच समुद्रात नेहमी डॉल्फिन माशांचे दर्शन होत असते. काल पहाटे या समुद्रात रेवतळे येथील न्यू रापण संघाने रापण लावली होती. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रापणीची जाळी ओढण्यात येत असताना जाळ्यात सुमारे १५ हुन अधिक डॉल्फिन अडकल्याचे आढळून आले. मच्छीमारांनी या डॉल्फिन माशांची तात्काळ सुटका करून त्यांना पुन्हा समुद्रात सोडले. यामध्ये सुभाष मिठबावकर, जॅकी गिरकर, विजय फाटक, इनास डिसोझा, अमय मांजरेकर, मंगेश वेंगुर्लेकर, अशोक पेडणेकर, महेश हडकर, बाबू मेंडीस, कर्नल फर्नांडिस, बाबत डिसोझा, जोसेफ फर्नांडिस या मच्छीमारांचा समावेश होता.
