मोकाट जनावरे मालवणसाठी ठरतेय डोकेदुखी
मालवण (प्रतिनिधी) मालवणात मोकाट गुरांचा प्रश्न नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरला असून शहरातील भूमी अभिलेख कार्यालय रस्त्यावर मोकाट बैलांची झुंज लागल्याने या झुंजीत रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी वाहनांना बैलांची धडक बसल्याने वाहनांचे नुकसान झाले. यामुळे पुन्हा एकदा मालवणातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मालवण शहरात मोकाट गुरे व त्या बरोबरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मात्र गुरे व कुत्रे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास अथवा त्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका प्रशासन सातत्याने अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात सर्वत्र मोकाट गुरांचा संचार सुरू असून रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या या गुरांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. तर रात्रीच्या वेळी रस्त्यात फिरणाऱ्या गुरांमुळे अपघातही होत आहेत. तर गुरांकडून होणाऱ्या घाणीमुळेही व्यापारी, दुकानदार व नागरिक त्रस्त आहेत. कळपाने फिरणाऱ्या या गुरांमध्ये कधी कधी झुंजी देखील लागत असल्याने अशावेळी नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये- जा करावी लागते. भूमी अभिलेख कार्यालय समोरील रस्त्यावर बैलांची झुंज लागल्याने त्यामध्ये दुचाकी वाहनांना बैलांची धडक बसून त्या रस्त्यावर पडल्याने दुचाकींचे नुकसान झाले. याबाबत संबंधित दुचाकी धारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरपालिकेने शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
