अनधिकृत वॉटरस्पोर्ट्स विरोधात बंदर विभागाची धडक कारवाई

आठ व्यावसायिकांवर पोलिसांत गुन्हा दाखल

मालवण (प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने सध्या मालवणातील पर्यटन व्यवसाय जोमात असतानाच बंदर विभागाने अनधिकृतपणे वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मालवण समुद्रात अनधिकृत रित्या साहसी जल क्रीडा व्यवसाय करणाऱ्या मालवणातील सात ते आठ पर्यटन व्यावसायिकांवर बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर यांच्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी हंगामानिमित्त सध्या मालवणात पर्यटकांची रेलचेल असून सर्व पर्यटन व्यवसाय जोमात आहेत. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या जलक्रीडा व्यवसाय देखील तेजीत आहे. मात्र मालवण समुद्र किनारी काही पर्यटन व्यावसायिक बंदर विभागाची कोणतीही परवानगी न घेता प्रवासी नौकेतून पॅरासिलिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग इत्यादी साहसी जल क्रीडा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने परवानाधारक पर्यटन व्यावसायिकांनी बंदर विभागाकड़े आक्षेप घेत तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात अनधिकृत पणे जलक्रीडा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अनधिकृत पर्यटन व्यवसाय केल्या प्रकरणी आनंद रघु राठोड, सुभाष रमेश राठोड, अनिल जयराम पुजारी, सतीश रामचंद्र आचरेकर, गुरू बासू चव्हाण, राजू रुपसिंग चव्हाण, किरणकुमार रामू राठोड आणि एक जण असे एकूण आठ जणांविरोधात मालवण पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन हंगामात झालेल्या या कारवाईमुळे अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page