कठोर कारवाईची नगरसेवकांची मागणी;सावंतवाडी नगरपरिषद मासिक सभा
*⚡सावंतवाडी ता.१०-:* सावंतवाडी शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवित आहे. मात्र, त्याला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक नासिर शेख व सुधीर आडिवरेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली. सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक सभा आज बुधवारी नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या सभेत विविध विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेतर्फे सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान हाती घेण्यात आले आहे. मात्र, या अभियानाला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कचरा रस्त्यानजीक ठेवलेल्या कुंडीत न फेकता तो रस्त्यावर कुठेही फेकला जातो. त्यामुळे शहरात अस्वछता पसरत आहे, याकडे नासिर शेख व सुधीर अडीवरेकर यांनी लक्ष्य वेधले. हे सावंतवाडी शहराच्या नावलौकिकास शोभणारे नाही. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी नगराध्यक्ष परब यांच्याकडे केली. सर्व विरोधी नगरसेवकानीही यास पाठिंबा दर्शविला. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत : शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
