मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ नाही;महेश कांदळगांवकर यांची माहिती
*⚡मालवण ता.०९-:* मालवण शहरात मालमत्ता करामध्ये यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय मालवण नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना मोठी झळ बसली. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा देण्याचे काम नगरपालिकेने केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने मालवण पालिका अधिनियमातील तरतूदीप्रमाणे चार वर्षातून एकदा नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांच्या मालमत्ता करामध्ये वाढ करण्याची तरतुद आहे. त्यानुसार सन २०२०-२१ मध्ये अशाप्रकारे कर वाढ प्रस्तावित होती. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे जगजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीची झळ समाजातील प्रत्येक घटकाला बसली आहे. व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे यावर्षी कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला आहे. यावर्षी पाणीपट्टीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्या पाठोपाठ करवाढ न करण्याचा निर्णय घेवून मालवणवासीयांना थोडा दिलासा देण्याच काम नगरपालिकेने केले आहे, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
