बॅनर ठरत आहेत लक्षवेधी
मालवण (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी तारकर्ली देवबाग या रस्त्यावर तसेच कांदळगाव मसुरे या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबत अज्ञातांनी बॅनरबाजी केल्यानंतर आता याच बॅनरबाजीचे लोण चौके नेरूरपार कुडाळ या रस्त्यावर जागोजागी आढळून येत आहे या बॅनरबाजीत स्थानिक लोकप्रतिनिधी वर अप्रत्यक्षपणे टीका टिपण्णी करण्यात आली आहे यात एका बॅनरवर तर “पहिलं वैभव कणकवलीत होतं आता तेच वैभव खड्ड्याच्या रूपाने मालवण- कुडाळ रस्त्यावर दिसतंय”, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत अलीकडेच कांदळगाव आणि तारकर्ली देवबाग मार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्याच्या दुर्दशे बाबत अज्ञातांनी बॅनर लावून नाराजी व्यक्त केली होती. या बॅनर वरील शेरेबाजीतून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना टार्गेट करण्यात आले होते. चौके -काळसे -नेरूरपार- कुडाळ मार्गावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून आता या रस्त्यावरही ठिकठिकाणी अशाच प्रकारचे बॅनर झळकले आहेत. या मार्गावरील खड्डे देखील अद्याप पर्यंत बुजविण्यात आलेले नसून रस्त्याचे कामही झालेले नाही. खड्ड्यांमधून कसरत करत वाहनचालकांना ये- जा करावी लागत आहे. मालवणात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून कुडाळ मार्गे येणाऱ्या पर्यटकांमधून देखील रस्त्याच्या दुर्दशेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे काम होत नसल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधीं विरोधात या बॅनर मधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “तुम्हाला निवडून देऊनि आम्ही हात जोडीले, ह्या रस्त्यावर प्रवास करताना आमचे कंबरडे मोडीले”, “शिवी न घालता मालवण कुडाळ प्रवास करा आणि मिळवा बंपर ऑफर, “पहिलं वैभव कणकवलीत होतं आता तेच वैभव खड्ड्याच्या रूपाने मालवण-कुडाळ रस्त्यावर दिसतंय”, “मालवण नेरूरपार कुडाळ रस्त्याने खड्ड्यातून जाऊ, पुन्हा तुम्हाला निवडून “देऊ” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे सर्व बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले असून खड्डेमय रस्त्यांवर लावण्यात आलेले बॅनर तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत अधिकच भर पडली आहे
