लसीकरण मोहिमेसाठी जात असताना जानवली ग्रा. प. समोर झाला होता अपघात
*⚡कणकवली ता.०६-:* कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी दुचाकीने येत असताना महामार्गाचा मिडलकट क्रॉस करताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने वरवडे आरोग्य केंद्र अंतर्गत सातरल उपकेंद्रचे आरोग्य सेवक विजय गोविंद जाधव (५२) हे गंभीर जखमी झाले होते.५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असताना त्यांचे बरोबर एक महिन्याने शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. अपघातावेळी त्यांच्या मागे दुचाकीवर बसलेल्या आरोग्यसेविका या देखील जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर विजय जाधव यांना बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली. विजय जाधव यांचे मूळ गाव मालवण तालुक्यातील चुनवरे येथे आहे. मालवण मधून त्यांनी आपल्या आरोग्य सेवेची सुरवात केली. त्यानंतर त्यांची कणकवली वरवडे आरोग्य केंद्रात बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुली, असा परिवार आहे. त्यांच्यावर चुनवरे येथील मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
