दोन वर्षांपासून निराधार फिरणाऱ्या महिलेला मिळाला आधार

संविता आश्रमाने दिला आश्रय

वैभववाडी प्रतिनिधी तब्बल दोन वर्षापासून वैभववाडी शहरात निराधार महिला फिरत होती. सदर महिला उघड्यावरचे टाकलेले अन्न खाऊन जगत होती. खाण्यासाठी कोणी दिले तर मनात असल्यास स्वीकारत होती. अनेक वेळा रस्त्यावर भटकत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण करत होती. परंतु उपद्रवी नव्हती. त्यामुळे वैभववाडीकरांना तिचा त्रास नव्हता. परंतु काळजी वाटत होती. काळजीपोटी अनेकांच्या मनात तिला आश्रमाचा आधार मिळावा असे वाटत होते. यातूनच वैभववाडी येथील प्राथमिक शिक्षक दशरथ शिंगारे यांनी संविता आश्रम पणदुरचे संस्थापक संदीप परब यांच्याशी संपर्क करून सदर महिलेला आपल्या आश्रमात दाखल करून घेण्यासंदर्भात विनंती केली. दरम्यान निराधार महिलेला आश्रमात दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी संदीप परब आणि त्यांचे सहकारी उदय कामत, पल्लवी परब, विद्या आणि बबिता दाखल झाले. दरम्यान संदीप परब यांनी श्री शिंगारे यांना सदर महिलेचा शोध घेण्याचे दूरध्वनीवरून कळविले. श्री. शिंगारे यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वैभववाडी रेल्वे फाटक येथे सदर महिला दिसून आल्यानंतर संदीप परब यांच्या टीमशी संपर्क केला. आणि त्या निराधार महिलेला आश्रमात दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्या ठिकाणी काही वेळातच मदत व सहकार्य करण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक अतुल जाधव आपल्या टीमसह उपस्थित होते. यावेळी पोलीस हवालदार प्रिती शिंगारे, माधुरी अडुळकर, पोलीस अंमलदार सोनल गोसावी, श्री. कांबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोलाचे सहकार्य व आश्रमाला मदत म्हणून वैभववाडी येथील मेडिकल व्यावसायिक संजय सावंत यांनी २ हजार रुपयांची रोख मदत केली. तसेच पोलीस हवालदार प्रीती शिंगारे व माधुरी अडूळकर यांनी निराधार महिलेला साडी घेण्यासाठी आर्थिक मदत केली. याप्रसंगी वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती श्रीपात मांजरेकर, वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक संजय सावंत, व्यापारी संघाचे पदाधिकारी बंड्या सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय रावराणे, श्री. भालेकर चिंचवली, वैभववाडी येथील व्यावसायिक सुनिल कुंभार, अरुण हवालदार, रोहन रावराणे, अरुण ब्रह्मदंडे आदींनी उपस्थित राहून सदर निराश्रित महिलेला आधार मिळण्यासाठी सहकार्य केले. वैभववाडी करांकडून सविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव होत आहे.

You cannot copy content of this page