दिवाळी भेट देत जपली सामाजिक बांधिलकी
मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी, सर्वसामान्यांची लालपरी, कित्येक सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिकांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या मालवण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवण कडून दीपावलीच्या पूर्वसंध्येला खास दिवाळी भेट देण्यात आली. कोरोना कालावधीतही या संघटनेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले होते.कोरोना आपत्तीचा सर्वात जास्त परिणाम हा एसटी महामंडळ व तेथील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. अशा या आपत्तीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न तसेच आजही बहूसंख्येने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व शिक्षक बंधू-भगिनींना सुरक्षित प्रवासाची सेवा हे कर्मचारी देतात. याच उद्देशाने एसटी कर्मचाऱ्यांप्रती शिक्षक समितीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी भेट हा उपक्रम मालवण आगारात राबविण्यात आला. या उपक्रमांतून मालवण आगारातील संपूर्ण २७७ कर्मचाऱ्यांना मिठाई, साबण, मेणबत्ती, उटणे व त्यांच्या मनाला उभारी देणारे ग्रिटिंग कार्ड भेट देण्यात आले. ग्रिटिंग कार्डचे शब्दांकन कवी श्री.रामचंद्र कुबल सर यांनी केले होते. मालवण आगाराचे व्यवस्थापक श्री.एन.व्ही.बोधे यांनी यावेळी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी यावेळी या उपक्रमाची माहिती सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना देऊन शिक्षकांच्या प्रेमाची भेट स्वीकारण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने केले. यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, कार्याध्यक्ष रुपेश गरूड, कोषाध्यक्ष तथा संचालक राजेंद्रप्रसाद गाड, शिक्षक नेते मंगेश कांबळी, सल्लागार श्रीकृष्ण सावंत,जिल्हा महिला उपाध्यक्षा विशाखा रावले, महिला संघटक श्वेता यादव, भाग्यश्री वाडकर,जिल्हा कार्यकारिणीचे राजन जोशी,तालुका उपाध्यक्ष सुयोग धामापूरकर, माजी सचिव राजेंद्र कडूलकर,विभागप्रमुख जीवन हजारे ,नंदकिशोर पाडगावकर , सदानंद डिकवलकर, तानाजी गावडे, नितीन कदम, उदय कदम आदि कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. या उपक्रमांस जिल्हाध्यक्ष नितिन कदम व ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण यांनीही शुभेच्छा दिल्या.
