बांधकाम समितीत व्यक्त केली नाराजी
सिंधुदुर्गनगरी ता ०३ १५ व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील मंजूर ९६ कामापैकी अद्याप एकही काम पूर्ण नाही. केवळ २ कामे प्रगतीत तर तब्बल ८८ कामे निविदा प्रक्रियेत अडकल्याची बाब बुधवारी झालेल्या बांधकाम समिती सभेत उघड झाली. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता लक्ष्मण परुळेकर ,सदस्य रेश्मा सावंत, राजेश कविटकर, श्रेया सावंत, जरोन फर्नांडिस आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. १५व्या वित्त आयोगा अंतर्गत (जिल्हा परिषद स्तर) विविध प्रकारच्या ९६ मंजूर कामापैकी केवळ २ कामे प्रगतिपथावर असून तब्बल ८८ कामे निविदा प्रक्रियेत आहेत. ६ कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. अद्याप एकही काम पूर्ण झालेले नाही. अशी माहिती बांधकाम समिती सभेत दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा वार्षिक आराखड्यातील ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षातील एकूण २४३ मंजूर कामापैकी १३४ कामे निविदा प्रक्रियेत १९ कामे प्रगतीत तर १९ कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.अशी माहिती बांधकाम समिती सभेत देण्यात आली. जिल्ह्यात शाळा दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना शाळा दुरुस्तीच्या एकूण २३४ मंजूर कामापैकी केवळ २४ कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तसेच ६३ कामे प्रगतीत असून ३८ कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या कामांसाठी १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये निधी खर्च झाला असून अद्यापही ९ कोटी ४४ लाख ८६ हजार एवढ्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सभेत देण्यात आली. आजच्या सभेत देवगड तालुक्यातील म्हावळुंगे शाळा दुरुस्ती ,कुडाळ तालुक्यातील झाराप शाळा दुरुस्ती बाबत चर्चा झाली असता या शाळा २०२१- २२ च्या आराखड्यामध्ये घेण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची कामे तसेच शाळा दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. निधी अखर्चित राहणार नाही तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने कामाची गती वाढवा. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
