कौशल्य विकासाची मेढ ग्रामीण भागात रोवल्यावरच देश आत्मनिर्भर

विवेक तावडे यांचे प्रतिपादन

*⚡देवगड ता.२७-:* देश समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकासाची मुहूर्तमेढ ग्रामीण भागात रोवणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, शिक्षण याबरोबर अनेक पातळ्यांवर अग्रेसर राहिला आहे यापुढे कौशल्य विकासामध्येही जिल्हा देशात अग्रेसर राहावा यासाठी तरुणांनी पुढे येऊन तंत्रज्ञानाची कास धरावी यातूनच कुशल तंत्रज्ञ घडतील असे मार्गदर्शन सिमेंन्सचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर विवेक तावडे यांनी शिरगांव येथे केले. सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्ट, शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, रश्मी कर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अंतर्गत शिरगाव राक्षसघाटी येथील पुंडलिक अंबाजी कर्ले सभागृहात ग्रामीण भागातील युवकांसाठी विनामूल्य १५ दिवसाच्या बेसिक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा २६ ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमास सिमेंस ऐक्यचे अशोक राणे, शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संभाजी साटम, संस्था पदाधिकारी अॅड. प्रकाश जाधव, प्रकाश गोठणकर, वसंत साटम, आर जी सावंत, मंगेश लोके, सरपंच समीर शिरगांवकर, उपसरपंच अमित साटम, पुंडलिक अंबाजी कर्ले वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, विलास तावडे, माजी उपसरपंच दिलीप आईर, दिलीप पाळेकर, गोविंद परब, बंडू माने, राकसवाडी सेवा मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागवे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले की, जग भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहत असताना तरुण पिढीला दिशादर्शक मार्गदर्शनाची गरज आहे. कुशल कामगाराला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर भविष्यात ग्रामीण भागाचा विकास दूर नाही. गांव समृद्ध करण्यासाठी फक्त तरुणाईने पुढे येण्याची गरज आहे. कुशल तंत्रज्ञानासाठी यापुढे शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी ग्राम पातळीवरच उपलब्ध होतील. शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शमशुद्दीन आत्तार म्हणाले, देशाच्या प्रगतीत कुशल कामगारांचे मोठे योगदान असते. कुशल कामगारांबरोबरच ग्रामीण भागात पुरक रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे यापुढे शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कार्यक्रमास ग्रामस्थ व प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page