जिल्हा परिषद विशेष सभेत एकमुखी निर्णय
ओरोस-:२०२२-२३ च्या जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात अंतिम मंजुरी मिळण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.सादर करण्यात येणाऱ्या या आराखड्यात कामे नसल्याने विरोधी शिवसेना सदस्यांनी मंजुरी देण्यास विरोध दर्शविला होता.परंतु अध्यक्षा संजना सावंत यांनी ज्या सदस्यांच्या मतदारसंघातील नावे घ्यायची शिल्लक राहिली आहेत.ती नावे चार दिवसांत द्यावीत.त्याचा समावेश करण्यात येईल,असे सांगितल्यानंतर एकमताने सर्व आराखडे मंजूर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, सत्ताधारी भाजप गटनेते रणजित देसाई, रेश्मा सावंत, संतोष साटविलकर, विष्णुदास कुबल, विरोधी शिवसेना गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, प्रदीप नारकर, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते. जगात सर्वाधिक १०० कोटी लोकांचे लसीकरण भारत देशात झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रितेश राऊळ यांनी मांडला. माजी वित्त व बांधकाम सभापती आबा मुंज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी सादर करावयाच्या विविध आराखड्याना मंजुरी देण्यासाठी आज खास सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शाळा दुरुस्ती व नवीन इमारत, जनसुविधा अंतर्गत क वर्ग यात्रास्थळ, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, महिला व बाल कल्याण, बांधकाम विभाग रस्ते नूतनीकरण या आराखड्यांचा यात समावेश होता. या आराखड्यात आपल्या मतदार संघातील कामे नाहीत. लेखी मागणी करून सुद्धा नावे आलेली नाहीत, असे सांगत शिवसेना सदस्यांनी आराखड्याला मंजुरी देण्यास नकार दिला. यामुळे थोडा वेळ सभागृहात वातावरण तंग झाले होते. मात्र रणजित देसाई व संतोष साटविलकर यांनी ज्यांची नावे नाहीत. ती नावे समाविष्ट करून आराखडा जिल्हा नियोजनकडे समाविष्ट करावा, असे सांगितले. त्यामुळे अध्यक्षा सौ सावंत यांनी तशाप्रकारे आदेश दिले. त्यानंतर सेनेने सुद्धा या सर्व आराखड्याना एकमुखी मंजुरी दिली. घरकुल योजनेचा पुन्हा सर्व्हे करावा यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या ड यादीत हजारोंच्या संख्येने नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे घेण्यात यावीत, अशी मागणी गावोगावच्या सरपंच यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सर्व्हे करावा. दोन खोल्यांची अट शिथिल करावी, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला. तो ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.
