*⚡मालवण ता.२२-:* माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मालवण भरड येथील शिवाजी वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाच्या कार्यवाह वैदेही जुवाटकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या खडतर जीवनाबद्दल विवेचन केले. तर शांभवी कोळगे यांनी डॉ. कलाम यांचे जीवनचरित्र कथन केले. दि. १ जानेवारी २०२२ रोजी शिवाजी वाचन मंदिरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि या संस्थेची इमारत लवकरात लवकर पूर्ण करून वाचनालयाचा शतक महोत्सव नवीन इमारतीत करणार आहोत. या नवीन इमारतीत तरुण वाचकांचा कल लक्षात घेऊन इमारत बांधण्याचा विचार करावा, असे शांभवी कोळगे यांनी सांगितले. बाल वाचक क्षितीज दूधवडकर याने शरीराची वाढ होण्यासाठी जसे अन्नाची गरज असते तसेच ज्ञानाची भूक असली पाहिजे. आपण अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन दिवसातून किमान एक तास करावे, असे सूचविले. द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. सुभाष दिघे यांनी मिरासदार यांची ‘भूताचा जन्म’ ही कथा वाचून दाखविली. डॉ. दिघे व सौ. मेधा शेवडे यांनीही किस्से सांगितले. श्रीधर काळे यांनी मिरासदार यांच्या जीवनावर लिहिलेल्या लेखाचे वाचन केले. कार्यक्रमाची सांगता वैदेही जुवाटकर यांनी केली.
शिवाजी वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा
