*⚡मालवण ता.२२-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील येथील समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू करावे. या बंधाऱ्याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास महिन्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तळाशील समुद्र किनारी आंदोलन छेडण्याचा इशारा तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सागरी अतिक्रमणामुळे तळाशील समुद्र किनाऱ्याची होणारी धूप तात्काळ थांबविण्यासाठी शासन दरबारी वारंवार निवेदने पाठवूनही त्याची दखल न घेतल्याने १५ ऑगस्ट रोजी तळाशील ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण छेडले होते. त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्गचे पत्तन अभियंता यांनी भेट देऊन धूप होणाऱ्या भागाची पाहणी करून तात्काळ ३१ लाखांचे प्रत्येकी ६५ मीटर लांबीचे तीन तात्पुरते बंधारे उभे करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित ठेवण्यात आले. परंतु, त्या ठिकाणी तात्पुरता बंधारा दिसत नाही. सदरील काम तात्काळ पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
तळाशील बंधाऱ्याचे काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा
