*⚡कणकवली ता.१८-:* “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो..!” या उक्तीप्रमाणे समाजातील उपेक्षित, गरजू, अनाथ व निराधार व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच हाकेला धावून जाणारे समानवता ट्रस्ट यांनी निरंतर विधायक कार्य सुरूच ठेवले आहे. संजोग नांदोसकर या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. घरात कोणीही कमवता नाही. मुलांची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन ठेपली. या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या समानवता परिवाराकडून सदर महिलेला उद्योग-धंदा देऊन जीवनात उभारी देण्याचा प्रयत्न व आत्मनिर्भरता पूर्वक तिला सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून पीठ व मसाले दळण्याची मशीन देण्यात आली. तळेरे (ता. कणकवली ) येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. समानवता संस्थेच्या अध्यक्ष सुषमाताई तायशेटे, सचिव कमलेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांच्या उपस्थितीत सदर महिलेला मशीन वाटप करण्यात आले. यावेळी तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश तळेकर व इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.
पतीचे छत्र हरपलेल्या निराधार महिलेला समानवतेचा मदतीचा हात
