श्री गणेश येशू मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*⚡मालवण ता.१८-:* मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी सत्यनारायण पूजे साठी साकारण्यात आलेले शंकराच्या रूपातील भव्य आकाराचे मखर लक्षवेधी ठरले. मालवणातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्र विधी संपन्न झाला. तर दि.१५ रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी संगीत भजन, रात्री येशू पूजा (तेस) संपन्न झाली. यावेळी सत्यनारायण पूजे साठी शंकराच्या रूपातील भव्य आकाराचे केळीच्या खोडापासून मखर बनविण्यात आले होते. हे मखर नेरूरपार येथील प्रवीण मेस्त्री यांनी साकारले होते. हे मखर सर्वांचेच आकर्षण ठरले. तर दि. १६ रोजी पहाटे काकड आरती, दुपारी ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम पार पडले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यास हिंदू व ख्रिश्चन बांधवानी उपस्थित राहून लाभ घेतला. यावेळी गणेश येशू मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष आंतोन (आतू) फर्नांडिस, उपाध्यक्ष बबन वाघ, कार्याध्यक्ष दीपक कदम यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page