*⚡मालवण ता.१७-:* मालवण गवंडीवाडा येथे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला धनगर समाज बांधवांचा दसरोत्सव उत्साहात साजरा झाला. घटस्थापने पासून सुरू झालेल्या या उत्सवात जागर, सीमोल्लंघन यासह पारंपारिक गजी नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. धनगर बांधवांचा हा पारंपारिक दसरोत्सव खुल्या प्रांगणात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गवंडीवाडा येथील राम मंदिराच्या समोरील परिसरात लक्ष्मीचा मांड भरवून हा उत्सव साजरा होतो. यावेळी धनगर बांधवांच्या घरघरातील देवींना एकत्र आणले जाते. घटस्थापने पासून दहा दिवस चाललेल्या उत्सवात आठव्या दिवशी जागर, नवव्या दिवशी नवरात्रोत्सवाचा जागर, आणि दहाव्या दिवशी सीमोल्लंघनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पूजा अर्चा करतानाच धनगर बांधवांचे पारंपारिक गजी नृत्य सादर झाले. या उत्सवात बबन बोडेकर, रमेश बोडेकर, शशिकांत बोडेकर, भगवान वरक, जयेश यमकर, बबन शिंदे यांसह इतर धनगर समाज बांधव महिला सहभागी झाल्या होत्या.
मालवणात धनगर समाजाचा पारंपारिक दसरोत्सव साजरा
