एडगावचे माजी सरपंच पुंडलिकराव रावराणे यांचे दुःखद निधन
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे माजी सरपंच पुंडलिकराव रामकृष्ण रावराणे वय 87 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचे ते वडील होतं. पुंडलिकराव रावराणे सन 1965 मध्ये एडगाव या गावचे पहिल्यांदा उपसरपंच झाले. 1970 मध्ये एडगाव गावच्या सरपंच पदी ते बिनविरोध विराजमान झाले. पुढे 1970 ते 1995 ह्या सुमारे 25 वर्षाचा प्रदिर्घ काळ एडगाव गावचे बिनविरोध सरपंच म्हणून रावराणे यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. एडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुंडलिक रावराणे यांची सरपंच पदाची कारकीर्द गौरवशाली आणि ऐतिहासिक अशीच ठरली आहे.वैभववाडी तालुक्याच्या निर्मितीत श्री रावराणे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ते वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संस्थापक सदस्य होते. तसेच ते वैभववाडी तालुका ग्रृह तारण संस्थेचे विद्यमान चेअरमन म्हणूनही कार्यरत होते. गावच्या रवळनाथ विकास सोसायटीत त्यांनी चेअरमन पदावर काम पाहिले होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी आमदार नितेश राणे व सर्व राजकीय पक्षाची मंडळीं तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. रावराणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
