मालवणः (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे बंद असलेली मंदीरे राज्यशासनाने ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार असल्याची माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना दि ७ ऑक्टोबर २०२१ पासून शासनाने मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दरवर्षी आंगणेवाडी येथील भराडी मंदिर हे घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर पाच दिवस पर्यंत बंद असते त्याप्रमाणे यावर्षी ही आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर घटस्थापनेनिमित्त ७ ऑक्टोबर पासून २४ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत पारंपारिक धार्मिक पूजा विधी होणार असल्याने नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे आदी विधी बंद राहणार आहेत. २५ ऑक्टोबर पासून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांना श्री भराडी देवीचे दर्शन घेता येईल. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.
भराडी देवीचे मंदिर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी होणार खुले
