*⚡मालवण ता.०५-:* मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत चांगल्या दर्जाचे काम व पारदर्शक कारभार होत आहे. ठेकेदारही मोकळा श्वास घेऊन कामे करत आहेत. ठेकेदारांनी आर्थिक नाडी बंद केल्यामुळेच नगरपालिकेच्याच विकासकामांना अडथळा आणून नगराध्यक्षांवर टीका करण्याचे काम उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश कुशे हे करत आहेत. वराडकर व कुशे यांनी आपल्या स्वतःच्या वॉर्ड मध्ये कोणतीही विकास कामे केलेली नसून जनतेला हे सर्व माहीत आहे. त्यामुळे जनताच वराडकर व कुशे यांचा निकाल लावेल, अशी टीका मालवण नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वतीने बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मालवण नगरपालिकेत नगराध्यक्ष दालनात शिवसेना नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, नगरसेविका तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, आकांक्षा शिरपुटे आदी उपस्थित होते. यावेळी मंदार केणी म्हणाले, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे हे कचरा टेंडरच्या विषयावरूनच सातत्याने आरोप करत आहेत. ठेकेदाराने आर्थिक नाड्या बंद केल्यामुळेच ते टीका करत सुटले आहेत. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत चांगले काम सुरू आहे. ठेकेदारांवर कोणतेही दडपण नाही. नगरपालिकेने मोकळा श्वास दिल्यानेच चांगली कामे होत आहेत. तरीही नगरपालिकेच्याच म्हणजेच स्वतःच्याच विकासकामांना आडकाठी आणण्याचे काम वराडकर व कुशे हे करत आहेत. गणेश कुशे यांनी आपल्या प्रभागात बसवलेली घसरगुंडी एवढाच त्यांनी केलेला विकास आहे. स्वतःच्या वॉर्डात ज्या रस्त्यांवर गटारांची गरज नाही त्याठिकाणी गटारे बांधून रस्त्यांची रुंदी कमी करण्याचे काम वराडकर – कुशे यांनी केले. वराडकर व कुशे हे स्वतःच्याच वॉर्डात अपयशी ठरले असून जनता त्यास साक्षी आहे. जनतेला अपेक्षित विकास कामे न करणाऱ्या वराडकर व कुशे यांनी राजीनामा द्यावा असेही मंदार केणी म्हणाले. नगराध्यक्षांचा सूड घेण्यासाठीच वराडकर व कुशे या दोन संख्या असलेल्या मंडळाचे टीका करण्याचे काम सुरू आहे. शॉपिंग मॉल, पार्किंग झोन, ऍक्वेरियम व इतर विकासकामे कायदेशीर अडथळे दूर करून पूर्ण करण्याचे प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहेत. मात्र ते विरोधकांना दिसत नाही. विकासकामांमध्ये केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मंदार केणी यांनी केला.
वराडकर व कुशे यांचा निकाल जनताच लावेल – मंदार केणी
