मालवण तालुक्यातील शाळांच्या घंटा वाजल्या…

मालवण : (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे गेले वर्षभर बंद असलेल्या राज्यातील शाळा राज्य शासनाच्या आदेशानुसार आज सुरू झाल्या असून मालवण शहरासह तालुक्यातही शाळांच्या घंटा वाजून पुन्हा एकदा शाळा गजबजल्या आहेत. काही अपवाद वगळता मालवण शहरात आठवी ते बारावी व तालुक्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आल्या असून शाळा चालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाविषयक शासकीय नियमांचे पालन करत व विद्यार्थ्यांची तपासणी करत शाळा भरल्या आहेत. गेले वर्षभर घरातच बसून ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांनीही शाळा सुरू झाल्याने मोकळा श्वास घेतला आहे. कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रभावामुळे गेले वर्षभर शाळा व महाविद्यालयये बंद राहिली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांनी घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला. मात्र ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, थेट अध्यापनाचा अभाव, व ऑनलाईन पद्धत आणि मोबाईलचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणार विपरीत परिणाम या समस्यांमुळे शाळा सुरू करण्याची मागणी पालकवर्गातून होत होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य शासनाने ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश देत शहरी भागात आठवी ते बारावी व ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज सोमवारी शाळा सुरू झाल्या. मालवण शहरासह तालुक्यात आजपासून पुन्हा एकदा शाळा गजबजल्या असून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कोरोना विषयक खबरदारी व मार्गदर्शक नियमांचे पालन करून सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही शाळांचा अपवाद वगळता इतर शाळांमधील वर्ग तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग शासनाच्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसेच टेम्प्रेचर तपासणी, ऑक्सिमिटर द्वारे तपासणी करून विद्यार्थ्यांची नोंद ठेवली जात होती. वर्गातही एका बेंचवर एक विध्यार्थी यानुसार बैठक व्यवस्था करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरातील भंडारी हायस्कूल, कुडाळकर हायस्कूल, टोपीवाला हायस्कुल, रोझरी इंग्लिश स्कुल, कन्याशाळा आदी शाळांना भेट देत मुख्याध्यापक व शिक्षक, तसेच विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page