आराखडा मंजुरीवरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली बांधकाम समिती सभा

सिंधुदुर्गनगरी ता ०४ मागील बांधकाम समिती सभेत आयत्या वेळच्या विषयात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद स्व निधी खर्च आराखड्याला आजच्या सभेत मान्यतेसाठी सभागृहासमोर ठेवण्यात आले होते. मात्र आर्थिक बाबींचा समावेश असलेला आराखडा आयत्या वेळी घेता येत नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीला आज शिवसेना सदस्यांनी कडाडून विरोध केला. तसेच असे नियमबाह्य काम करता येते का असा प्रश्न सचिवांना विचारात यावर त्यांचे मत माडण्यास सांगितले. यावरून सत्ताधारी सदस्य आणि शिवसेना सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर सदस्यांनी या विषयावर आपापले मत मांडण्याची सूचना सभापतींनी करत या वादावर पडदा टाकला. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी समिती सचिव लक्ष्मण परुळेकर, सदस्य प्रदीप नारकर, रेश्मा सावंत, राजेश कविटकर, मनस्वी घारे, श्रिया सावंत, संजय आंग्रे, अधिकारी आदी उपस्थित होते. मागच्या बांधकाम समिती सभेत जिल्हा परिषद स्व उत्पन्न, जिल्हा परिषद निवासस्थाने दुरुस्ती खर्च आराखडा आयत्या वेळच्या विषयात घेण्यात आला होता. या आराखड्याला आजच्या सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र या विषयाला सदस्य प्रदीप नारकर यांनी आक्षेप घेत आर्थिक बाब असलेला आराखडा आयत्या वेळी घेता येतो का ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मागील सभेच्या सचिवांनी या विषयासाठी खास सभा घेण्याची सूचना केली होती ती खास सभा न घेताच आराखडा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेसमोर कसा काय ठेवण्यात आला आदी प्रतिप्रश्न करत सभा सचिवांना धारेवर धरले. मात्र सभापती यांनी हा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असल्याने त्यावर या सभेत चर्चा नको असे सांगितले. यावर शिवसेना सदस्य आक्रमक होत सभापती आणि सभा सचिव यांना पुन्हा कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला. यावर सत्ताधारी सदस्यांनी ही हा विषय मंजूर झाला असल्याने चर्चा नको असा सूर धरला यावर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र आर्थिक बाब असलेला विषय आयत्या वेळी घेता येतो का यावर सभा सचिवांनी आपले मत नोंदवावे यावर सेना सदस्य ठाम राहिले. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांची नाचक्की झाली. अखेर सदस्यांनी या विषयावर आपापले मत मांडण्याची सूचना सभापतींनी करत या वादावर पडदा टाकला. सभा सचिवांचे मौन आजच्या बांधकाम समिती सभेत वादाचा मुद्दा ठरलेल्या स्वनिधि आराखड्याला मान्यता देण्याच्या विषयावर हा विषय आयत्या वेळी घेता येतो का यावर प्रभारी सचिव यांना आपले मत मांडावे अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. मात्र या विषयावर प्रभारी सचिवांनी सभागृहात मौन पाळत या विषयावर भाष्य करणे टाळले.

You cannot copy content of this page