*⚡मालवण ता.०३-:* जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या क्षमता ओळखून ध्येय निर्धारित करा.मोठी स्वप्नं बघा आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी प्रामाणिक व हृदयापासून प्रयत्न करा,यश निश्चितच तुमच्या समोर नतमस्तक होईल, असे प्रतिपादन आजगाव येथील विद्याविकास अध्यापक विद्यालयाचे प्रा.रुपेश पाटील यांनी मालवण येथे बोलताना केले. मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि आजादी का अमृत महोत्सव निमित्त ‘चला यशस्वी होऊया’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी प्रा.रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी विविध टिप्स दिल्या. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, जिमखाना प्रमुख डॉ.चोपडे यांनी प्रा.रुपेश पाटील यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगेश महाडिक यांनी केले यावेळी बोलताना प्रा रुपेश पाटील यांनी जीवनामध्ये यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजून जो अपयशावर मात करतो तोच खरा यशस्वी असतो. विद्यार्थी दशेत स्वतःवर चांगले संस्कार बिंबवून मार्गक्रमण करा.छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबा आमटे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या म्हपुरुषांचा आदर्श ठेवा. मोठ्या स्वप्नांना बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करा. जीवनात चांगले मित्र आणि चांगले मार्गदर्शक गुरु अंगीकारा. यश तुमच्या पायी लोटांगण घालेल असे ते म्हणाले
सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करा,तरच यश मिळेल- प्रा.रुपेश पाटील
