घराघरांत घुमला गणरायाचा गजर

*⚡बांदा दि.११-:* ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’… असा जयघोष, त्यासमोर नाचणारी बच्चेकंपनी…अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शुक्रवारी घराघरात गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी बच्चेकंपनीपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी दुपारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात विघ्नहर्त्या गणरायाचा गजर घुमला. गणरायाचे आगमन होणार असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. बहरलेल्या शेतीतून गणरायाची मूर्ती घरी आणल्यानंतर अनेक गावांत दुपारीच गणरायाची प्रतिष्ठापना करणे पसंत केले. तर अनेकांनी सकाळीच ब्राह्मणांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना केली. गतवर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे भाविकांनी स्वतः गणरायाची पूजाअर्चा केली हाेती. परंतु यंदा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रशासनाकडून काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे ब्राह्मणांच्या उपस्थितीत गणरायाची पूजा केली. गेल्यावर्षी कोरोनामुळे गावी न आलेले चाकरमानी यंदा आल्याने गावे गजबजलेली दिसून आली. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांनी गणरायाच्या भजनाचा सूर धरला होता.

You cannot copy content of this page