खासदार सुरेश प्रभू यांचे आश्वासन
*⚡मालवण ता.११-:* पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी लागणार सहकार्य देण्यास आपण सदैव तत्पर आहोत, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची त्यांच्या मालवण येथील निवासस्थानी भेट घेतली व महासंघाच्या वतीने दि. २७ सप्टेंबर रोजी मालवण येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे नियंत्रण दिले. तसेच महासंघाच्या वतीने भविष्यात जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत या जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी आग्रह धरुन महासंघाने काम करण्याबाबत प्रभू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णू उर्फ बाबा मोंडकर, जिल्हा सचिव अॅड. नकुल पार्सेकर, खजिनदार गुरुनाथ राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत आदी उपस्थित होते.
