खासदार सुरेश प्रभू यांची टीका
*⚡मालवण ता.११-:* आपण केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री असताना चिपी विमानतळाच्या कामाबाबत बैठक घेऊन रेंगाळलेले काम सुरू करताना विविध परवानग्या मिळवून दिल्या होत्या. तसेच विमानतळाच्या टर्मिनल उदघाटन प्रसंगी केवळ फीत न कापता विमानातून प्रवास करत विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. मात्र दुर्दैवाने त्यानंतर राज्य सरकारने विमानतळासाठी आवश्यक रस्ते, पाणी वीज ही स्थानिक पातळीवरील कामे पूर्ण केली नाहीत. या विमानतळाच्या उदघाटनाच्या तारखा ठरविल्या गेल्या असतीलही मात्र आपल्याला उदघाटनाबाबत कोणतीही माहिती नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेर्पा खासदार सुरेश प्रभू यांनी मालवण येथे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली गणेश चतुर्थी निमित्त माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मेढा मालवण येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या उत्सवासाठी आलेल्या सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी व जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू, माजी आमदार विनय नातू, विजय केनवडेकर व इतर उपस्थित होते. कोकण किनारपट्टीवर धडकणारी वादळे तसेच महापूर याबाबत बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, गेल्या तीन चार वर्षात किनारपट्टी भागात अनेक वादळे येत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. विकासाच्या प्रक्रियेत अनेक गोष्टींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हवामानात बदल होत आहेत. विकास करणे ठीक आहे. मात्र विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाला स्थान नसेल तर विकासाऐवजी विनाश होईल. वादळांचा उगम समुद्रात होत असतो. तापमान वाढीमुळे समुद्रही तापत असून त्यामुळे अनेक वादळे निर्माण होत आहेत. अलीकडे आलेली वादळे ही जागतिक तापमान वाढीचाच परिणाम असून या वादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तापमान वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच मासेमारी, शेती व इतर अनेक गोष्टी या पर्यवरणाशी सुसंगत असल्या पाहिजे. तसेच सरकारने वादळे, पूर यातील नुकसान होणाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे असेही प्रभू म्हणाले. यावेळी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, समुद्रात मच्छीमारीसाठी प्रत्येक राज्याच्या आपापल्या सीमा असल्याने एका राज्यातील नौका दुसऱ्या राज्यात जाऊन मच्छीमारी करत असेल तर आपल्या राज्याच्या सागरी हद्दीत अशा नौकांना येऊ न देणे ही त्या त्या राज्यशासनाची जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडे याबाबत कोणतीही यंत्रणा आजपर्यंत नाही, तसेच तशी घटनेत तरतूदही केलेली नाही. मात्र अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी गरज असेल तशी तरतूद केली पाहिजे तसेच पारंपारिक मच्छीमार आपल्या छोट्या मच्छीमारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहायला हवे. समाजाने व सरकारने पारंपारिक मच्छीमारांना मदत केली पाहिजे, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही पारंपारिक मासेमारीला मोठे महत्व आहे, असेही प्रभू म्हणाले. देशात वाढलेली महागाई कमी करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. येत्या काळात ही महागाई कमी होईल अशी आशा यावेळी सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली. यावेळी मालवण शहर विकास आरखड्याबाबत बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, शहर विकास आराखड्याच्या मुद्द्यावर मालवणची गत निवडणूक झाली असली तरी मी मते मिळावी यासाठी कधी काम करत नाही. मालवणचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे. मात्र ज्यांची प्रथम जबाबदारी आहे त्यांनी शहर विकास आराखड्याच्या प्रश्नाबाबत लक्ष घालून त्यादृष्टीने पाठपुरावा केला पाहिजे, असेही ते म्हणाले कोकण वासीयांवर सातत्याने नैसर्गिक संकटे येत आहेत. सतत येणाऱ्या वादळांमुळे व होणाऱ्या नुकसानी मुळे कोकण माणसाचे कंबरडे मोडून जात आहे. त्यामुळे नेहमी गणपतीला स्मरून आपलं जीवन जगणाऱ्या कोकणी माणसावर गणरायाने आपली कृपा ठेवावी तसेच कोकणवासीयांना नैसर्गिक संकटांपासून दूर ठेवावे, असे साकडे आपण गणरायाचरणी घातले आहे असेही यावेळी सुरेश प्रभू यांनी सांगितले.
