कणकवली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्नसुरक्षा आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णय स्वागतार्ह असले, तरी त्यांची अंमलबजावणी करताना जिल्हास्तरावर खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला. समीर नलावडे मित्रमंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हर्णे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांसाठी अन्न व पाणी तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. मात्र, शासकीय प्रयोगशाळेऐवजी खासगी प्रयोगशाळांकडून तपासणी करून घेतली जात असून त्यासाठी पाणी तपासणीसाठी सुमारे २,३०० रुपये आणि प्रत्येक अन्न नमुन्यासाठी १,००० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाला सरासरी ३,३०० ते ५,३०० रुपये खर्च करावे लागत आहेत.
शासकीय यंत्रणेमार्फत पाणी तपासणीचे शुल्क सुमारे ९४० रुपये असताना खासगी प्रयोगशाळांकडून त्यापेक्षा दुप्पटहून अधिक शुल्क आकारले जात आहे. शासकीय प्रयोगशाळा अपुऱ्या असतील तर त्या सक्षम कराव्यात किंवा खासगी प्रयोगशाळांना शासकीय दरानेच तपासणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. अन्न नमुने दिवसभर गोळा करून रात्री उशिरा प्रयोगशाळेत पाठविले जात असल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच अशा पद्धतीमुळे तपासणी अहवालांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्णे पुढे म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीमुळे अनेक हॉटेल व्यावसायिक उघडपणे बोलण्यास धजावत नाहीत. कारवाईची भीती असल्याने व्यापारी आवाज उठवू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कणकवली येथे एका दिवसात सुमारे १७५ हॉटेल व्यावसायिकांकडून तपासणी शुल्काच्या माध्यमातून ७ ते ८ लाख रुपये जमा झाल्याचा दावा करत, अशाच प्रकारची शिबिरे जिल्ह्यातील इतर ठिकाणीही होत असल्याने खासगी प्रयोगशाळांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्नसुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, मात्र त्याचवेळी व्यापाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये. शासकीय यंत्रणा सक्षम करून वाजवी दरात तपासणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
