इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ३० बॉक्समधील ५४० बाटल्या हस्तगत..
⚡बांदा, ता.०७-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मद्यसाठा आणि सुमारे ६ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचळकर तसेच सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता इन्सुली येथील तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना टोयोटा इनोव्हा कार क्रमांक एमएच-४३-एजे-१८१९ संशयास्पदरीत्या आढळून आली. वाहनाची झडती घेतली असता त्याच्या मागील सीटखाली व डिक्कीमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या मद्याचे ३० बॉक्स, त्यामध्ये एकूण ५४० बाटल्या आढळून आल्या.
याप्रकरणी वाहनचालक रितेश प्रभू म्हात्रे (३५, रा. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची अंदाजे किंमत ४ लाख २४ हजार ८०० रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम, संदीप कदम, जवान तथा वाहनचालक दिपक वायंगडे, सागर सूर्यवंशी, सतीश चोगुले व अभिषेक खत्री यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करीत आहेत.
