खारेपाटण रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष बाळा जठार यांनी दिली माहिती
*⚡कणकवली ता.०९-:* खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरच १०० % पूर्ण करणार असल्याचा निर्धार खारेपाटण प्रा आ केंद्र रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी व्यक्त केला आहे. जि. प.च्या अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठया प्रमाणात कोविड लसीचा साठा उपलब्ध होत आहे. त्यांचे खारेपाटण विभागाकडे विशेष लक्ष असून आम्ही रुग्ण कल्याण समितीने मागणी केल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी या खारेपाटण प्रा.आरोग्य केंद्राला लसींचा मुबलक पुरवठा केला आहे. त्यामुळेच या परिसरात लसीकरणाची चांगली टक्केवारी गाठणे आम्हांला शक्य झाले असल्याचे देखील श्री.जठार यांनी यावेळी सांगितले. खारेपाटण प्रा.आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना खारेपाटण येथे येणे शक्य नसल्याने रुग्ण कल्याण समितीने प्रत्येक गावागावात जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.आजअखेर खारेपाटण प्रा.आरोग्य केंद्र अंतर्गत पुढील प्रमाणे लसीकरण पूर्ण झाले आहे. खारेपाटण प्रा.आ.केंद्र – 8780, ग्रामपंचायत खारेपाटण – 400, खारेपाटण काजिर्डे – 250, नडगिवे – 800, वायंगणी – 100, शेर्पे-1300,कुरंगवणे-340, चिंचवली-300,शिडवणे-980,वारगाव-850,साळीस्ते-300 अशा एकूण 14400 लसींचा पुरवठा खारेपाटण प्रा. आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाला असल्याची माहिती यावेळी श्री.जठार यांनी दिली. नजीकच्या काळात अजून मोठया प्रमाणावर लसींचा पुरवठा होणार असून लवकरच या परिसरातील सर्व लाभार्थ्यांचे व नागरिकांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले. लसीकरणाच्या या मोहिमेत खारेपाटण प्रा आरोग्य केंद्र येथील आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचा उल्लेखही यावेळी रवींद्र जठार यांनी व्यक्त केला.
