ठाणे उपायुक्तांवरील हल्ल्याच्या घटनेचा केला निषेध : त्या परप्रांतीय व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
*⚡सावंतवाडी ता.३१-:* ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त असणाऱ्या कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यवसायिकांने धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जख्मी केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, अत्यावश्यक काम वगळता कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या मार्केट मधील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील एका परप्रांतीय व्यवसायिकांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी त्यांनी त्या परप्रांतीय व्यवसायिकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
