मालवण दि प्रतिनिधी गेले अकरा दिवस मुंबईसह कोकणात फिरणाऱ्या केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले ना. राणे यांचे विश्वासू सहकारी आणि वडाळा मुंबईचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या मालवण दौऱ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. बाळ नरे यांची मालवण येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीच शिवाय दोन्ही मित्र भूतकाळातील आठवणीत रममाण झाले मुंबई परेलचे माजी नगरसेवक आणि मालवणचे सुपुत्र श्री. बाळ नरे हे गेले काही वर्ष मालवण रेवतळे येथील आपल्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. गेले काही वर्ष त्यांना अर्धांग वायूमुळे घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. बाळ नरे यांनी शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. शिवसेना संघटना वाढीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. श्री. बाळ नरे हे आमदार कालिदास कोळंबकर यांचे एकेकाळचे सहकारी असून आजही त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यावर असलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी मालवण दौऱ्याच्या वेळी आपल्या रेवतळे येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर श्री. बाळ नरे हे रेवतळे भागात वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर आम. कोळंबकर यांनी आपले सहकारी मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर, परशुराम पाटकर यांच्यासह लागोलग श्री. नरे यांचे घर गाठले. आम. कोळंबकर हे अचानक घरी आल्याने श्री. नरे यांना सुखद धक्का बसला या दोन्ही मित्रांनी एकमेकांना आलिंगन देत तब्यतीची ख्यालीखुशाली विचारली. यावेळी आम. कोलंबकर आणि बाळ नरे हे दोन्ही मित्र जुन्या आठवणीत रमले. त्यांच्या या आठवणीत नरे कुटुंबीय सहभागी झाले होते.
भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतली शिवसेना माजी नगरसेवक बाळ नरे यांची भेट
