आचऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार…

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मालवण दि प्रतिनिधी गेल्या काही दिवसात आचरा पारवाडी भागात दिवसाढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या बिबट्या बाबत ग्रामस्थात भीतीचे वातावरण असतानाच आता वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या मालकीच्या गाईच्या वासरावर हल्ला चढवित त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान भर वस्तीत फिरणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. आचरा पारवाडी भागात एकटाच नजरेस पडणारा बिबट्या हा आचरे वरचीवाडी येथे दोन बछड्यांसह दिसून येत असल्याने दोन्ही ठिकाणी वेगवेगळे बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. यातच दोन्ही ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने रानावनात गुरे चारावयास जाणाऱ्या गुराख्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शनिवारी आचरा कुपेरी डोंगर येथे महेंद्र आचरेकर यांनी गाईच्या वासराला चरायला सोडले होते. यावेळी बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. यात आचरेकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाने तातडीने दखल घेउन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page