सावंतवाडी : केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रेतील सभा व त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणातील गर्दी केल्याप्रकरणी शहरात नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले तर कोलगावात भाजपाचे जिल्हा केंद्र संयोजक महेश सारंग, सरपंच संतोष राऊळ आदी मिळून तब्बल 34 जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलाम 143,188, 269, 270 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा काल रात्री उशिरा 11 च्या सुमारास सावंतवाडी येथे दाखल झाली यावेळी प्रथम कोलगाव येथे त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर त्याठिकाणी राणे यांची सभा पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह शहरातील भोसले उद्यान येथे दाखल झाल्यानंतर याठिकाणी देखील हजारो कार्यकर्ते उपस्थिती होते. ढोलताशाच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तर त्यानंतर सभा देखील पार पडली. यावेळी उशिरापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे बेकायदेशीर सभा भरवून नियमांचा भंग करून ब्रेक द चेन सूचनांचा आदेश झुगारून कोरोना विषाणू संसर्ग फैलावण्यास कारणीभूत होईल असे कृत्य केल्याप्रकरणी आयोजकांसह 34 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात कोलगाव येथील आयोजक कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, महेश सारंग, संदेश राऊळ आदी व शहरातील नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, महेश पांचाळ आदीसह 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे
जमावबंदी आंदोलनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सावंतवाडी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
