संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी वेधले लक्ष;महामार्गाचे प्रश्न आठ दिवसात सोडविणार
*⚡कणकवली ता.२०-:* कणकवलीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून कणकवली एसटी स्टँड समोरील उड्डाण पुलाखालून एसटी स्टॅन्डमधून बाहेर जाणाऱ्या व एसटी स्टॅन्डमध्ये येणाऱ्या एसटीसाठी उड्डाण पुलाखालून एकच मार्ग ठेवला असल्याने कणकवली शहरात वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे एसटी स्टँड मधून बाहेर जाणाऱ्या एसटीसाठी अजून एक मार्ग तयार करा. याकरिता पुलाखाली केलेले बॅरिकेट काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता मण्यार यांच्याकडे केली. तसेच कणकवली शहरातील महामार्ग संदर्भात अन्य समस्याही शिवसेनेकडून मांडण्यात आल्या. यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक सुशांत नाईक देखील उपस्थित होते. कणकवली शहरातील हायवेलगत चे पथदिवे सुरू करावे, दोन्ही बाजूच्या सर्विस रोड चे ड्रेनेज खुले करावे, आर ओ डब्ल्यू मधील अतिक्रमण हटवावी, तसेच कणकवली शहरातील महामार्गा लगतच्या विविध ठिकाणच्या रिक्षा स्टॅन्ड साठी कायमस्वरूपी जागा मिळावी आदी मागण्यांसाठी श्री पारकर यांनी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांचे फोन द्वारे संपर्क साधत लक्ष वेधले. श्री शेख यांनी आठ दिवसात मागणी केलेल्या कामांबाबत तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपअभियंता श्री मण्यार, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, दिलीप बिल्डकॉनचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर समर सिंग, अभियंता अभिजीत पाटील व शहरातील काही रिक्षाचालक उपस्थित होते.
