बांधकाम समिती सभा
ओरोस-:बांधकाम समितीसमोर स्वनिधीतील कामे मंजुरीसाठी ठेवली होती का ? ज्या कामांना या समितीने मंजुरी दिली नाही त्या कामांच्या खर्चाला आम्ही का मंजुरी द्यावी , असे सांगत सदस्य प्रदीप नारकर यांनी झालेल्या कामांच्या खर्चाच्या मंजुरीच्या प्रस्तावाला सभेत आक्षेप घेतला. तर या समितीसमोर मंजुरीसाठी कामे न ठेवता ज्या नियमाखाली कामे मंजूर केली त्याच नियमाने खर्चाला मंजुरी घ्या असे सांगत नारकर यांनी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. मात्र बहुमताने खर्चाला मंजुरी घ्या असे सभापती महेंद्र चव्हाण यांनी सांगत मंजूरी दिली. जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव , समिती सदस्य प्रदीप नारकर , रेश्मा सावंत , राजेश कवीटकर , जेरॉन फर्नांडिस , संजय आंग्रे , अर्चना घारे आदीसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. आजच्या बांधकाम समिती सभेत यापूर्वी २०१९-२० मध्ये झालेल्या कामाच्या खर्चाला मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता . या प्रस्तावाला सदस्य प्रदीप नारकर यांनी आक्षेप घेत ही कामे केव्हा व कोणी मजुर केली ? या कामांची यादी मंजुरीसाठी बांधकाम समितीसमोर ठेवण्यात आली होती का ? जी कामे या समितीने मंजूर केली नाहीत त्या कामाच्या खर्चाला या समितीने मंजुरी का द्यावी ?असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले . तर ज्या नियमाखाली कामांना मंजुरी दिली त्याच नियमाने आता खर्चाला मंजुरी घ्या. या समितीकडे मंजुरी का मागता ? असा प्रश्न प्रदीप नारकर यांनी केला . यावेळी सभापती महेंद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करत पूर्वी झालेल्या कामांच्या खर्चाला मंजुरी मागतो . झालेल्या कामाची बिले अदा करणे आपल्यावर बंधनकारक आहे . त्यामुळे बहुमताने या खर्चाला मंजुरी घ्यावी असे स्पष्ट केले . मात्र यावर नाराजी व्यक्त करत स्वनिधीतील कामांना कोणत्याही सभागृहात मंजुरी घेतलेली नाही . केवळ दायित्व दाखवून सभागृहात केवळ बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने खर्चाला मंजुरी मिळवली जाते. याबाबत कामांची यादी किंवा इतर माहिती जिल्हा परिषद सदस्य असुनही दिली जात नाही . त्यामुळे माहितीचा अधिकार वापरावा लागत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया सभेत व्यक्त केली. सन २०१८-१९ व २०१९-२० ची स्वनिधीतील काही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत .मात्र या कामांना कार्यारंभ आदेश दिल्याने दायित्व दिसत आहे. अशी कामे होणार नसतील तर ती रद्द करा. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी बांधकाम समिती सभेत दिले . मात्र ही कामे रद्द करताना कामें न होण्यामागची कारणे नमूद करा असे सांगितले . गणेशोत्सव जवळ आला असून जिल्ह्यातील अनेक रस्ते नादुरुस्त खड्डेमय झाले आहेत . अशा रस्त्यांची तात्काळ डागडुजी करा . रस्त्यालगतची धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्या तोडून गणेशउत्सवापूर्वी सर्व ग्रामीण रस्ते वाहतुकिसाठी सुरक्षित करा , अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली.
