वित्त सभापती महेंद्र चव्हाण
*⚡ओरोस ता.१२-:* २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला प्राप्त होणारा निधी व स्वनिधी डिसेंबर २०२१ मध्ये खर्च होण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगिक विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती वित्त सभापती महेंद्र चव्हाण यांनी गुरुवारी झालेल्या वित्त समिती सभेत दिली. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, सदस्य संतोष साटविलकर, नागेंद्र परब, जेरॉन फर्नांडिस, अनघा राणे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मागील सभेत संतोष साटविलकर यांनी किती निधी मागे गेला ? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर प्रशासनाने सभेत दिले. २३ कोटी ९५ लाख रुपये मागे गेल्याचे प्रशासनाने सांगितले. यावर साटविलकर यांनी हा निधी कशामुळे मागे गेला ? असा प्रश्न करीत निधी आल्यावर कार्यवाही सुरू करण्यापेक्षा त्यापूर्वी ती प्रक्रिया करून ठेवावी असे सांगितले. यावर सभापती चव्हाण यांनी यावर्षी तसे होणार नाही. १०० टक्के निधी डिसेंबर महिन्यात खर्च होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. यावर निधी मागे जाणार असेल तर वित्त समितीसह जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत चर्चा झाली पाहिजे. सर्व सदस्यांना याची माहिती आवश्यक आहे, असे वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे यांना सांगितले. तसेच केवळ वित्त विभाग याला जबाबदार नसून अन्य विभाग सुद्धा जबाबदार असल्याचे सांगितले. मात्र, यात वित्त विभागाची बदनामी होत असल्याकडे लक्ष वेधले. नाविन्यपूर्ण योजनेतून नाभिक समाजाला खुर्च्या पुरविणे यासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना तयार झाली का ? तालुकास्तरावर याची माहिती गेली का ? असा प्रश्न साटविलकर यांनी उपस्थित केला. यावर ग्राम पंचायत विभागाने कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करीत साटविलकर यांनी आता कोणाची वाट पाहताय ? असा प्रश्न केला. येत्या काही दिवसांत याबाबत तालुकास्तरावर कळविले जाईल, असे आश्वासन ग्राम पंचायत विभागाने दिले. तसेच पुढील सभेपासून ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.
