नंदा गावडे यांची मागणी : ग्रामीण भागातील नागरिकांची वाहतुकीची समस्या
*⚡बांदा दि.११-:* गणपती उत्सवात लागणाऱ्या घरगुती साहित्य खरेदीसाठी मडुरा पंचक्रोशीसह आरोस मधील नागरिकांना खरेदीसाठी बांदा व सावंतवाडी बाजारपेठेत यावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली बांदा-शिरोडा व सावंतवाडी-पाडलोसमार्गे सातार्डा एसटी प्रवाशांची अडचण लक्षात घेता सुरू करावी अशी मागणी, पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे यांनी केली आहे. कोकणात श्रावण महिन्यापासून अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील बहुतांश गावातील एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही अंशी फेऱ्या सुरू केल्या आहेत. बांदा-शिरोडा मार्गावरील आरोस, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले भागातील नागरिकांना बाजारासाठी बांदा बाजारपेठेत यावे लागते. तसेच सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी किंवा खरेदी, प्रशासकीय कामांसाठी जावे लागते. सद्यस्थितीत दोन्ही एसटी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक फटका बसत आहे. साहजिकच बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराकडे येण्यासाठी एसटीची आवश्यकता भासते. त्यामुळे याकडे सरपंचांनी सुद्धा लक्ष द्यावे. एकंदरीत बांदा-शिरोडा मार्गावरील अनेक गावांची वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करत बांदा-शिरोडा व सावंतवाडी-सातार्डा या दोन्ही एसटी एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी, नंदा गावडे यांनी केली आहे.
