क्रांतीदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली छडण्यात आलेल्या आंदोलनाला संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी राज्यभर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेने सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर हे आंदोलन केले. जिल्हा संघटनेने जिल्हास्तरीय विविध मागण्यांची निवेदने देऊन, चर्चा करून सुद्धा प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, महिला आघाडी अध्यक्षा आशा गुणीजन, संतोष कोचरेकर, विनायक कांबळी, वसंत गर्कळ, मणीपाल राऊळ, श्रीराम विभूते आदींसह असंख्य जिल्हा व राज्य पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी अनुदान प्राप्त असताना शिक्षक पगार देण्यास होणारा विलंब टाळावा. डिसीपीएस मधील तफावती दूर करून हिशोब तक्ते द्यावे. २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू झालेली नाही. अशा शिक्षकांचे कपात झालेले हप्ते सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाने एक ते पाच हप्त्यात जमा करावे. डिसीपीस खाती एनपीएस मध्ये वर्ग करण्यापूर्वी डिसीपीएस मधील त्रुटी दूर करण्यात याव्यात. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यामुक्त करावे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे. २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षात विद्यार्थी पुढील वर्गात थेट प्रविष्ट झाले असल्याने त्याबाबत लेखी नोंदीची शिक्षकांवर सक्ती करू नये. वेतन निश्चितीतील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करावेत. सावित्रीबाई दत्तक पालक योजनेच्या लाभार्थी मुलींना पूर्वी प्रमाणे ३६० रुपये निधी द्यावा. शाळा बंद असल्याने नियमबाह्य देण्यात येणाऱ्या कामगिऱ्या रद्द कराव्या. सर्व शासन परिपत्रके शाळांना पुरविण्यात यावीत. सावित्रीबाई दत्तक पालक कमिटीवर शिक्षक भारती संघटनेला प्रतिनिधित्व द्यावे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरावी. खुल्या प्रवर्गातील सर्व मुलांना जिल्हा परिषद स्वनिधीतून गणवेश पूरवावेत. शिक्षक संजय कोळी यांची नियमबाह्य घेण्यात आलेली व्याज रक्कम परत द्यावी, अशा एकूण २४ मागण्या करण्यात आल्या.
प्राथमिक शिक्षक भारतीने २४ मागण्यांसाठी केले धरणे आंदोलन
