Headlines

सावंतवाडीच्या प्रा. शरयू आसोलकर यांचे अपघाती निधन…

शहरात शोककळा
कणकवली-नांदगाव येथे महामार्गावर इनोव्हा गाडीचा भीषण अपघात; भावाला किरकोळ दुखापत..

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी माठेवाडा येथील रहिवासी तथा कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि लेखिका श्रीमती शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९) यांचे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या भीषण अपघातात आज सकाळी दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे सावंतवाडी शहरासह माठेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शरयू आसोलकर या आपल्या बहिणीला राजापूर येथे सोडून इनोव्हा गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने परत येत होत्या. दरम्यान, कणकवली-नांदगाव येथील महामार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दुभाजकावर चढून खांबाला धडकली. या भीषण अपघातात शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू वैभव आसोलकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती समजताच सावंतवाडी माठेवाडा येथील नागरिकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नागेश जगताप, सुदेश नेवगी, महेश बांदेकर यांच्यासह माठेवाड्यातील मित्रपरिवार आणि नागरिकांनी रुग्णालयात मदतकार्य केले.
शरयू आसोलकर या शिक्षण क्षेत्रात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. अध्यापनासोबतच लेखिका म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माठेवाड्यातील रहिवासी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूर आणि बेंगळुरू येथील त्यांचे जवळचे नातेवाईक सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत.या घटनेची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page