Headlines

बांदा शाखा कालव्याच्या दुरुस्तीसाठी नितीन राऊळ आक्रमक…

तातडीने पाहणीची मागणी
२२ किलोमीटर कालव्याची साफसफाई, गळती प्रतिबंधक उपाययोजना व दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

बांदा/प्रतिनिधी
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून साफसफाई, गळती प्रतिबंधक उपाययोजना आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी तिलारी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांदा शाखा कालवा हा बांदा, ओटवणे, इन्सुली, रोणापाल तसेच परिसरातील शेती व बागायतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. या कालव्याच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची फळबागायती, भाजीपाला उत्पादन आणि अन्य कृषी व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र, यंदा परिसरात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भूजल पातळीतही घट होत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बांदा शाखा कालव्याची लांबी सुमारे २२ किलोमीटर असून, बांदा येथून इन्सुलीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. नियोजनानुसार येत्या १२ जानेवारीपासून कालवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष इन्सुलीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता कालव्याची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे आतापासूनच हाती घेणे आवश्यक असल्याचे राऊळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
सन २०२३ मध्ये बांदा, ओटवणे, इन्सुली व रोणापाल कालवा क्षेत्रातील काही भागांना अपेक्षित प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे बागायती आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. मागील अनुभव लक्षात घेता यंदा अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण २२ किलोमीटर कालव्याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर सर्वेक्षण करावे, कालव्यात वाढलेली झाडेझुडपे, गवत व अडथळे हटवावेत, साचलेला गाळ काढावा, तसेच विविध ठिकाणी होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कालव्याच्या भिंती, बांधकाम, पाणी नियंत्रण गेट्स, मोऱ्या व अन्य संरचनांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला आहे.
बांदा ते इन्सुली या संपूर्ण कालवा मार्गातील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी स्वतंत्र नियोजन करावे. तसेच पाणी सोडण्याचे वेळापत्रक आणि पाणीवाटपाचे नियोजन आगाऊ निश्चित करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी पाणी हे त्यांच्या वर्षभराच्या कष्टांचे आणि आर्थिक उत्पन्नाचे आधारस्थान आहे. त्यामुळे केवळ कालवा सुरू करण्याची तारीख निश्चित न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कालव्याची पाहणी करून दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page