स्थायी समितीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेद्वारे निर्णय घेण्याचा ठराव
*⚡ओरोस ता.०५-:* वडाचापाट नूतन ग्राम पंचायत इमारत प्रकरण आजच्या स्थायी समितीत चांगलेच गाजले. सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी मालवण गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी ग्रामसभेत जागा स्थलांतर विषय झालेला नाही, असे सांगितले. संतोष साटविलकर यांनी तहकूब सभा नियमात झालेली नाही. त्यामुळे त्या सभेतील ठराव ग्राह्य नाहीत, असे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी याबाबत चौकशी अहवाल सीईओ प्रजित नायर यांच्याकडे आला आहे. ते सोमवारी आल्यावर याबाबत त्यांना सांगून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. अखेर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत हा विषय ठेवून बहुमत असेल तसा निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, चुकीची प्रक्रिया राबविणाऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असा ठराव घेण्यात आला. वडाचापाट सरपंचाने जुनी ग्राम पंचायत जमीन मालकांना आठ दिवसांत बक्षीसपत्र देण्यास मुदत दिली आहे. यावरून सुद्धा साटविलकर यांनी प्रशासनास धारेवर धरले. जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा गुरुवारी संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, गटनेते रणजित देसाई, संजय पडते, संतोष साटविलकर, विष्णुदास कुबल, रवींद्र जठार, अमरसेन सावंत, मायकल डिसोझा यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
