कुणाच्याही दबावाला बळी न पडता नियमांनुसार लसीकरण करा

शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची आरोग्य विभागाला सूचना

*⚡वैभववाडी ता.०५-:* वैभववाडी तालुक्यातील मुख्य लसिकरण केंद्रावर काही दिवसांपूर्वी लसिकरण केंद्रावर उपस्थित नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासन व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तालुक्यातील लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तरी अद्याप काही मंडळी लसिकरण केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आपल्या सोयीनुसार आपल्या लोकांना लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. याची आरोग्य विभागाने दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होवू नये अशा पद्धतीचे काटेकोर नियोजन करून कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमांनुसार लसिकरण करावे. लसिकरणाचा सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितीत लाभ मिळेल याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावं ही दऱ्या खोऱ्याच्या दुर्गम भागात असल्यामुळे तेथून वाहतुकीच्या साधनांच्या असलेल्या कमतरतेमुळे सदर गावातील नागरिक लसिकरणासाठी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. परिणामी अशा अनेक गावात १०-२०% सुद्धा लसिकरण झालेले दिसत नाही. अशा गावांचा आढावा घेऊन आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत यांच्यामार्फत सुयोग्य नियोजन करून दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरण मोहीमेत सहभागी करून घ्यावे. तालुक्यातच्या ठिकाणी पहाटेपासून उपस्थित राहून त्यांची होणारी गैरसोय, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात लसिकरण केंद्राची व्यवस्था करण्यात यावी व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. याबाबतचे निवेदन आज तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य विभागाला देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, दिपक गजोबार, सुनिल रावराणे, बाबा मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page